लेख क्र .१
मत्प्रिय गझलेस
क्षेमालिंगन !!
किती काळ लोटला असेल , आपला पत्रव्यवहार झालाच नाही गं ! एक दहा / पंधरा वर्षांपूर्वी पर्यंत आपण खूप बोलायचो लेखनीतून . किती गोडवा होता त्या पत्रात . चिकटवलेलं पाकिट हळूवार उकलायचं . फोडायचं नाही. कारण आतल्या कागदावरचा मजकूर एवढा हळूवार असायचा ,की वाटायचं त्याला इजा होईल . ते सगळं काळाच्या पडद्याआड गेलंय असं वाटतं . पत्रलेखन पण आताशा खूप शुष्क झालंय . मेल वगैरे लवकर पोचतात गं पण गोडवा नाही त्यात . पत्र कसं आधी हुंगायचं . मग बघायचं .नंतर वाचायचं . पुन्हा पुन्हा त्याची पारायणं करायची . आणि छानशा पेटीत ठेवायचं . कधीतरी वाचण्यासाठी ! नंतर तितकंच छान त्याचं उत्तर लिहायचं . सारंच गोड . हवंहवंस ! आजकाल . . . सोड ते!
सखी , तुझीमाझी खरी भेट झाली त्याला आता ४४ वर्ष तरी झालीत. लिहित होते मी ,पण ती कविता म्हणूनच . पण १९७९ साली दादा भेटले , त्यांचं "रंग माझा वेगळा " वाचलं आणि तुझ्या आणखीच प्रेमात पडले .
त्यावेळी खूप मित्र मैत्रिणी होते गं तसे . कथा , कादंबरी , ललीत , स्फुट , संकीर्ण , प्रवासवर्णन , प्रासंगिक , इतरही अनेक जण आणि कविता ! कवितांचे प्रकार तर कितीतरी !!
कविता किती सजून यायच्या नाही? तशा साडी , कपाळी कुंकू , हातात बांगडी अन् आंबाडा किंवा दोन वेण्यातल्या होत्या काहीजणी . छान वृत्ताच्या उंबरठ्याच्या आत राहणाऱ्या . शालीन वाटायच्या गं त्या ! आणि असायच्या पण . अगं , काही जणी तर नऊवारीतल्या पण होत्या . तेव्हा हसू यायचं त्यांचं , त्यांच्या वेषभूषेचं ! पण आज कळतं , केवढ्या हुशार आणि खोल होत्या त्या . त्यातल्या काही जणी प्रेमात पडल्या , काही विरहिणी झाल्यात , काही भक्तीत रमल्या , अंगाई झाल्या आणि काही बोर्डावर पण नाचल्या . पण खांद्यावरचा पदर ढळू न देता !!
काहीजणींना हे नाही जमलं ! मुक्तछंदाशी मैत्री केली ना त्यांनी ? तरीपण आवडायच्या . जरा हटके पोषाखात ! अगं तेव्हाचा तरूण वर्ग तर तिच्या प्रेमातच पडला होता .
वाटायचं की असंच चालत राह्यलं तर कविता हरवून जाईल . पण तेव्हाच भट साहेबांनी तुझी भेट घडवून दिली , म्हणाले "हिची भेट घे ! बघ तुझी मैत्री होते का ? कारण तुम्हा दोघींच्या स्वभाव सारखाच आहे ! " अगं तुला सांगते , तुला भेटले आणि " प्रथम तुज पाहता .. " असं झालं माझं चक्क प्रेमातच पडले तुझ्या .
तुझी शालीन नजाकत भावली मनाला !
कागद पेन जवळ घेऊन तुझ्याशी गप्पा मारायला आवडू लागलं . तरूण होते तेव्हा . प्रेमगझल लिहीत होते . पण बंधन नव्हतं ना शेराचं . तुला कपाळी टिकली आवडायची ! पण कधी उभी रेघ , चंद्रकोर पण चालायची . साडीसोबत ड्रेसपण आवडायचा तुला . पायात चप्पल किंवा सँडल घालायचीस . एकाच पोषाखात कितीतरी प्रकार करायचीस . तरीही मस्त दिसायचीस . हेच तर तुझं बलस्थान होतं . म्हणून खरं तर मैत्री झाली आपली.
खरं सांगू गझले . . . तू मला आवडलीस आणि माझी झालीस . १४ / १५ च्या वयात कळत नव्हतं गं फारसं . पण मी लिहू लागले ते लयीत . आणि टीन एज संपता संपता कळलं की आपण लिहितोय ती गझल आहे. " गझलनंदा " म्हणून दादांनी शिक्कामोर्तब केलं आणि तू अन् मी अव्दैत झालो.
प्रेमळ गझला खूप लिहिल्या मी . हवेवर तरंगतच होते म्हण ना ! पण वयाच्या पंचेविशीत जगण्याचं कटू सत्य समोर आलं . प्रत्येक पावलागणिक निखारा भेटत गेला . समाजावरचा विश्वासच उडत गेला . डोळ्यातले अश्रू बंदच होत नव्हते . एका पिल्लाला सांभाळायला नोकरी गरजेची होती . दिसणं आणि बाई असणं हा शाप वाटत होता .आणि तेव्हाच मी तुला घट्ट बिलगले . खूप धीर आला . लिहिलं
"अश्रू अता कधीही मी गाळणार नाही
गालास स्पर्श माझ्या करतो कुणी कसाही "
सखी बोलायला कुणी नसलं की लेखणी कामी येते ते पटलं .
आज तुझ्यामुळेच थोडीशी ओळख मिळालीय , जरासं नाव मिळालंय . एकच सांगते , सतत सोबत रहा माझ्या . तुझ्या सोबत असण्याच्या कल्पनेनंही खूप दिलासा मिळतो .
आजकाल तुला वेगवेगळ्या भाषेत लोळवतात , काहीतरी नविनीकरण करतात आवडत नाही मला ते. पण जाऊ दे !
बाकी कशी आहेस ? तुला आपलंसं करणारे खूप जण आहेत बरं का ? सांभाळून रहा .
आता थांबतेच !! आपण आहोतच सोबत !
तुझीच सखी
गझलनंदा
Comments
Post a Comment