लेख २
*बदकांच्या कळपातला राजहंस : सुरेश भट*
*एका तळ्यात होती बदके पिले सुरेख*
सर्वांना ठावूक आहे हे सुप्रसिद्ध गाणं . गदिमांच्या या एका गीताने प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं . अगदी साधा शब्दार्थ घेतला तरी जाणवतं , की पाण्यात बदकापेक्षा वेगळ्या पद्धतीने पोहणाऱ्या त्या पिल्लाला कुणी आपल्यात घेतही नव्हतं खेळायला . खरं तर त्याचं चालणं , पोहणं सारंच डौलदार होतं . तरीही सारेच लोक त्याच्याकडे बोट दाखवून त्याला वेडं म्हणत. कारण ते पिल्लू वेगळं होतं . कुबड्यांच्या राज्यात बांधेसूद माणूसही कुरूप ठरतो म्हणतात असंच काहीसं . अर्थातच त्याचं त्या पिल्लाला दुःख होई. कुणाशी बोलणार ते? त्यालाच चोची मारणं, धाक दाखवणं व्हायचं. त्यालाही वाटून जायचं की खरंच आपण वेडं तर नाही ना?.
पण एक दिवस वेगळा उगवला . आरशा सारख्या स्वच्छ पाण्यात त्यानं आपलंच रूप चोरून बघितलं . आणि काय आश्चर्य , की त्याचं त्यालाच कळलं की तो , सामान्य नाही , तर असामान्य राजहंस आहे.
असं हे गोष्ट स्वरूपातलं काव्य आणि गीत . अनेकांना हा अनुभव येतो . गटबाजी मधे सामान्यांचा जयजयकार होतो , आणि असामान्य व्यक्ती उपेक्षित राहते . त्या असामान्य माणसाला वाईट वाटतं . पण त्यावेळी त्या गाण्यातल्या राजहंसा प्रमाने प्रत्येकानेच आपल्यातला नेमका राजहंस ओळखायला हवा.
माझे आदर्श असलेल्या एका कवीने तो ओळखला. कारण ही व्यक्ती तथाकथित सामान्य बदकांच्या पेक्षा निश्चितच वेगळी एक राजहंस होती.
"रविकिरण मंडळाची " कवी मंडळी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली होती. गेय कविता , गाणी घराघरात पोचली होती . ज्यांना गेय किंवा वृत्तबद्ध कविता जमत नव्हत्या ( पण हे कबूल कसं करणार ? ) ती मंडळी मुक्तछंदाकडे वळली. अर्थात कवी अनीलांनी जो मुक्त्तछंद सांगितला , त्यालाही एक अंगभूत लय होतीच. शिवाय अनिलांनी कितीतरी लयबध्द कविता लिहिल्या होत्याच , ज्यांची पुढे सुप्रसिद्ध गाणी झालीत. पण हा मुक्तछंद पुढे छंदमुक्तच झाला. आणि गद्यप्राय लेखन कविता म्हणून पुढे आलं . असो.
त्या काळात सर्वत्र हेटाळणीचे सूर पचवत , एक व्यक्ती राजहंस म्हणून उभी ठाकली. ती व्यक्ती म्हणजे *गझलसम्राट सुरेश भट .* बालपणी पोलिओ मुळे अधू झालेला पाय , सर्व सामान्य बुद्धीमत्ता लाभलेल्या या व्यक्तीने आपली शारीरिक ताकद ओळखली . दमसास ओळखला . त्याचा उपयोग पुढे लेखनात आणि गझल गायनात केला . सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या लेखणीची जादू त्यांनी ओळखली . काव्यातला अतिशय मोहक प्रकार म्हणजे गझल , ही मराठीत रुजवली . आणि केवळ रुजवूनच ते थांबले नाहीत , तर त्याला योग्य ते खतपाणी घालून तिचा डेरेदार वृक्ष बनवला. आज त्या वृक्षाची मधुर फळे आपण चाखतोय . रसिक या कल्पवृक्षातळी बसून गझल अनुभवतोय .
अमरावतीला जन्मलेले आणि आयुष्याचा बराच काळ नागपूरला काढलेले भटसाहेब . धंतोली मधे त्यांचं निवास स्थान होतं . आमचे करंटेपण म्हणजे विदर्भालाच ते नीटसे कळले नाहीत. आपल्या जवळ एक तेजस्वी , लखलखता हिरा आहे हे वैदर्भीय विसरले होते . कारण बदकांचा कळप हाच त्यांचा आदर्श होता. तत्कालीन कवींनी मराठी गझलेला कविता किंवा एक साहित्य प्रकार समजण्याचंच नाकारलं . पण तेव्हाही आपल्या खणखणीत शेरांमधून सुरेश भट व्यक्तच होत राहिले. अनेकांना ते शेर ठावूक आहेत . क्लास सोबत मास लाही हा कवी हवासा होता. देखण्या मुशाय -या पासून तर अगदी पानठेल्या वरच्या माणसालाही भट साहेबांचे शेर पाठ होते. कारण ते शेर सार्वकालीक आहेत . काही ओळी बघा.
*जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा*
*विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही*
आज महाराष्ट्रात आणि बाहेरही अशी पिढी तयार झाली आहे. स्वतः मधलं राजहंस असणं त्यांनी ओळखलं आणि ते राजहंसच होते . त्यांची थट्टा करणारे , त्यांना साहित्यिक न माणणारी बदकं कालौघात पाचोळ्यागत कुठे उडून गेलीत , कळलंही नाही.
या श्वासांनी कविता , गझल . लिहिणाऱ्या व्यक्तीने आपला आशीर्वादाचा हात माझ्याही डोक्यावर ठेवला तो डिसेंबर १९७९ मधे . चंद्रपूरला . आधी मी कविता लिहीत होते , अगदी ८ वी , ९ वी पासून . म्हणजे ६९ / ७० पासूनच .पण ती गझल आहे याची जाणीव मला दादांनी चंद्रपूरला १९७९ साली करून दिली. नुकतंच त्यांचं "रंग माझा वेगळा " हे पुस्तक आलं होतं माझ्या वाचनात. झपाटल्यागत वाचलं .आणि नंतर दादांनी गझल लेखनाचं योग्य मार्गदर्शन केलं . *"गझलनंदा "* हे टोपणनाव मला मिळालं .
मी स्वतः प्रचंड प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना
" दादांनी मला स्वतः मधला राजहंस " ओळखायला शिकवलं . गेली ४२/४३ वर्षे निर्दोष गझल मी लिहीत आहे. मग माझाही एखादा शेर बोलू लागला ,
*तुम्हीच ओवाळून घ्या तुमच्यापुढे पंचारती*
*आहे अशी तेजाळती समई जुनी माझ्या घरी*
किँवा
*कालच्या टाळलेल्यांनी आज का आर्जवे केली*
*इथे सत्कार करण्याची योजना चालली आहे*
किंवा
*रोवून पाय आहे आदर्श पर्वताचा*
*आहे स्थिरावलेली मी सैर भैर नाही*
सुरेश भट म्हणजेच दादा लगावली , शुद्धलेखन , व्याकरण तपासून घ्यायला , नव्याने गझलतंत्र शिकणाऱ्यांना माझ्याकडे पाठवीत. साधारण पणे १९९४ पासून . तेव्हा मी परत नागपूरला आले होते. पण मी गझलगुरू झाले नाही . कारण मराठी गझलेचा साक्षात विश्वकोषच आमच्यापुढे होता . ही हिमालयाची उंची लाभलेली माणसं आम्ही जवळून बघितली , त्यांच्याकडे शिकलो , त्यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात सहभागी झालो , त्यांच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं , त्यांची मुलाखत घेतली .खरंच आमच्या पिढीला , मला स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटतो कधीकधी .
*कुबड्यांचा राज्यात बांधेसूद माणूससुद्धा कुरूपच दिसतो .* कारण अशी माणसं ही वेगळीच असतात , हे आम्ही जाणलं . बदकं लगेच ओळखायला येतात , कारण *नीरक्षीर विवेक* त्यांच्याकडे नसतो. वाघाचं कातडं ओढलेले लबाड कोल्हे तेव्हाच कळतात , जेव्हा . साक्षात एखादा खरा खुरा वाघ पुढ्यात येतो.
" जववरी ते तववरी
जंबूक करी गर्जना
जन त्या पंचानना
देखिले नाही रे बाप "
आजही असे जंबूक सर्वत्र दिसतात . हे वेगळे !
डायनिंग टेबल वरच्या खुज्या बांबूला आम्ही बांबू मानतच नाही . कारण आम्ही झाडीपट्टीच्या लोकांनी आकाशाचा वेध घेणारे वेळूवन प्रत्यक्ष बघितले आहे.
मित्रांनो आजही बदकांच्या कळपांची कमतरता नाही . त्या कळपात राहूनही *स्वतःचं राजहंसपण जपणं गरजेचं आहे.* अर्थात *कुणालाही आपण राजहंस आहोत , हे सांगावं लागत नाही . काळच ते ठरवीत असतो.*
*प्रा.सुनंदा पाटील*
*( गझलनंदा )*
८४२२०८९६६६
Comments
Post a Comment